
कणकवली : कणकवली येथील नामांकित शिक्षण संस्था, एस. एम. प्रशाला व ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी कु. सौरभ तारी याची अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्य दलात 'अग्नीवीर' म्हणून निवड झाली आहे. सौरभच्या या देदीप्यमान यशामुळे संपूर्ण कणकवली परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सौरभ हा एस. एम. ज्युनियर कॉलेजच्या वाणिज्य (Commerce) शाखेचा विद्यार्थी होता. आपल्या महाविद्यालयीन जीवनात तो अत्यंत हुशार, नम्र, अभ्यासू आणि मनमिळावू विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे. सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी त्याने सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे कठीण यश संपादन केले आहे.
सौरभच्या या यशाची दखल घेत कणकवली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ. संदीप सावंत. कार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर यांनी सौरभचे विशेष कौतुक करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एस. एम. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जी. एन. बोडके, उपप्राचार्य आर. एल. प्रधान ,पर्यवेक्षक जी.ए. कदम व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी सौरभच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. "सौरभने आपल्या कष्टाने आणि शिस्तीने हे पद मिळवले आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
सौरभच्या या यशामुळे ग्रामीण भागातील व प्रशालेतील विद्यार्थ्यांनाही सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल असे मत प्राचार्य जी. एन. बोडके यांनी व्यक्त केले.










