
दोडामार्ग : दोडामार्ग शिवसेना महिला संघटनेला धक्का देणारी घडामोड समोर आली असून, दोडामार्ग महिला तालुका प्रमुख सौ. चेतना चित्रसेन गडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा महिला जिल्हा प्रमुख अॅड. निता सावंत यांच्याकडे सादर केला आहे.
पक्षात एकनिष्ठपणे काम करूनही जि.प. व पंचायत समिती निवडणूक उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सौ. गडेकर यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
समाजकार्याच्या भावनेतून आणि तळागाळातील जनतेसाठी काम करण्याच्या उद्देशाने आपण शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत होते, असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. महिलांचे प्रश्न, सामान्य जनतेचे प्रश्न तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेशी थेट संपर्क, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि जनतेच्या आग्रहामुळे आपल्याला उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र योग्य वेळी योग्य संधी न मिळाल्याने मनस्ताप झाला असून जनतेसाठी लढण्याची संधी नाकारण्यात आल्याने आपल्या भावनांना धक्का बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सर्व पार्श्वभूमीवर आपण शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा आपण राजीनामा देत असून, तो मंजूर करून कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
या राजीनाम्यामुळे तसेच त्यांनी कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शिवसेनेच्या महिला संघटनावर याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










