
कुडाळ : आज पार पडलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत कुडाळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकलेल्या ४ उमेदवारांचे ५ अर्ज तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंचायत समितीसाठी दाखल झालेले सर्व ६४ अर्ज वैध ठरल्याने तिथल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणाचे अर्ज झाले बाद ?
कुडाळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रामुख्याने खालील उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत:
वर्षा कुडाळकर (अपक्ष): यांनी पिंगुळी आणि तेंडोली अशा दोन गटांतून अर्ज भरला होता, त्यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले आहेत.
रामदास ठाकूर (अपक्ष): पावशी मतदार संघातून त्यांचा अर्ज अवैध ठरला.
अंकुश जाधव (वंचित बहुजन आघाडी): पिंगुळी मतदारसंघातून त्यांचा अर्ज बाद झाला आहे.
कल्पेश मसगे (अपक्ष): पिंगुळी मतदारसंघातून यांचाही अर्ज बाद ठरला आहे.
या छाननी प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे आणि तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी आता ४३ अर्ज वैध ठरले आहेत, तर पंचायत समितीसाठी ६४ अर्ज वैध आहेत.
आता लक्ष 'माघारी'कडे !
अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. मात्र, खऱ्या अर्थाने लढतींचे स्वरूप हे अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच निश्चित होणार आहे. बंडखोरी टाळण्यासाठी आणि सोयीच्या लढती करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आता 'मनधरणी'च्या राजकारणाला वेग येणार आहे. किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि प्रत्यक्ष रिंगणात कोण राहते, याकडे संपूर्ण कुडाळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.










