
पक्षांकडून उमेदवार याद्या गुलदस्त्यातच
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार, 21 जानेवारी हा अखेरचा दिवस असताना, आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या पाहता राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या 50 गटांसाठी केवळ 12, तर पंचायत समितीच्या 100 गटांसाठीही फक्त 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एकच दिवस शिल्लक असताना, मंगळवार सायंकाळपर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1260 कोरे अर्जांची विक्री, पण दाखल केवळ 24 !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 जिल्हा परिषद गटांसाठी 503 100 पंचायत समिती गटांसाठी 757 असे मिळून एकूण 1,260 उमेदवारी अर्जांचे कोरे फॉर्म विकले गेले आहेत. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी 12 आणि पंचायत समितीसाठी 12 असे फक्त 24 उमेदवारांनीच अर्ज दाखल केले आहेत. कोरे अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष दाखल अर्जांतील ही तफावत अनेक राजकीय शक्यता सूचित करत आहे.
तालुकानिहाय अर्जांची स्थिती
जिल्हा परिषद कणकवली : 3,कुडाळ : 2,वेंगुर्ला : 2,सावंतवाडी : 5 (सर्वाधिक)
एकूण : 12 अर्ज
पंचायत समिती कणकवली : 1कुडाळ : 1,मालवण : 10 (सर्वाधिक)
एकूण : 12 अर्ज
आज शेवटचा दिवस, झुंबड निश्चित
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासह संबंधित ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे. इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांची ‘गोपनीय’ रणनीती
उमेदवार याद्या जाहीर न करण्यामागे बंडखोरी टाळण्याची रणनीती असल्याचे स्पष्ट दिसत आहे.भाजप,शिंदे गट,तसेच उद्धव ठाकरे गट, या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र युती आणि जागावाटपामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पक्षांनी ज्यांना उमेदवारी द्यायची आहे अशा संभाव्य उमेदवारांना वैयक्तिक पातळीवर अर्ज भरण्याचे ‘संकेत’ दिले आहेत, मात्र ही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
एकंदरीत काय आजचा दिवस संपेपर्यंत सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून अर्ज भरण्याच्या अखेरच्या तासांत खऱ्या अर्थाने राजकीय धडाका पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे.










