
वैभववाडी : भुईबावडा बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने काल (ता.१९)रात्रीपासुन धुमाकुळ घातला. बाजारपेठेत आलेल्या पाच जणांवर कुत्र्याने हल्ला करून जखमी केले आहे. सर्वाना उपचाराकरीता येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दोन वयोवृध्द आणि एका महिलेचा समावेश आहे.
भुईबावडा बाजारपेठ परिसरात भटका कुत्रा पिसाळलेला होता. या कुत्र्याने सोमवारी रात्रीपासुन धुमाकुळ घातला आहे. भुईबावडा बाजारपेठेत कामानिमित्त आलेले परप्रांतीय कामगार झोपडीत होते. कुत्रा रात्री झोपडीत शिरला त्याने येथील परशुराम राठोड या कामगाराचा चावा घेतला. त्यानतंर आज सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत या कुत्र्याने भुईबावडा बाजारपेठेत आलेल्या चार जणांवर हल्ला केला. यामध्ये जयवंती दत्ताराम पांचाळ, रघुनाथ भिकाजी मोहीते (ऐनारी)राजेंद्र रमेश पात्रे (तिरवडे तर्फे खारेपाटण), संतोष बाबु शेळके( भुईबावडा) यांचा समावेश आहे. यामध्ये एक महिला आणि दोन वयोवृध्दांचा समावेश आहे. सर्व जखमींना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.










