
वैभववाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन पाच दिवस उलटले असले, तरी वैभववाडी तालुक्यातून आतापर्यंत केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. आज (ता. २०) भुईबावडा पंचायत समिती मतदारसंघातून वासुदेव सदानंद काणेकर यांनी अपक्ष नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन तर पंचायत समितीच्या सहा जागा आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली होती. याकरिता आज पर्यंत १०२अर्ज विक्री झाले होते. मात्र सोमवारपर्यंत एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष वेधले गेले होते.आज भुईबावडा गणासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.
दरम्यान, उद्या (ता. २१) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालय परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये आज सकाळपासूनच हालचालींना वेग आला होता. भाजप, ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवारांच्या कागदपत्रांची पूर्तता, जात प्रमाणपत्र, प्रस्तावक व इतर आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून आले.उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत असल्याने व तालुक्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.










