
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील जि. प. पूर्व प्राथमिक शाळा परमे येथे जर्मनी येथील पाहुणे श्री. ॲड्रीस व श्रीम. ॲनेट या दाम्पत्याने सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेला ८५ युरो म्हणजेच भारतीय चलनात सुमारे १० हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत मुलांशी दिलखुलास संवाद साधला. परदेशी पाहुण्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेचे मुख्याध्यापक निलेश कृष्णा सावंत यांनी जर्मन पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच शिक्षिका जान्हवी रा. गवस, पदवीधर शिक्षक कवरलाल गावित व विशाल तायडे यांनीही मान्यवरांचे शाळेत स्वागत केले.
या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद नाईक व सर्व सदस्यांनी जर्मन दाम्पत्याचे मनापासून आभार व्यक्त केले.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री माझी शाळा मूल्यांकन समितीने देखील या शाळेला भेट दिली. समितीने शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या विविधांगी उपक्रमांचे विशेष कौतुक केले. यावेळी सरपंच प्रथमेश मणेरीकर यांनी शाळेच्या कार्याचे तसेच जर्मन पाहुण्यांच्या योगदानाचे कौतुक करत गावच्या वतीने आभार मानले.










