मुक्ताई अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचं युवराजांनी केलं कौतुक

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 19:30 PM
views 107  views

सावंतवाडी : क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे कनेडी विद्यामंदिर, कणकवली येथे जिल्हास्तरीय शालेय बुदधिबळ आणि कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताई अॅकेडमीच्या जिल्हाभरातील बावीस विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यावर्षी जिल्हा बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन अॅकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


अॅकेडमीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू कु. साक्षी रमेश रामदुरकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू कु. विभव विरेश राऊळ यांनी मागील वर्षाप्रमाणेच या वर्षी देखील चौदा वर्षाखालील गटात निर्विवाद वर्चस्व ठेऊन प्रथम क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय कॅरम खेळाडू कु. क्षितीजा मुंबरकर, बुद्धिबळ खेळाडू कु. राजेश विरनोडकर यांच्यासोबत अकरा विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना श्री. कौस्तुभ पेडणेकर सरांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीमंत खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी मुला - मुलींसाठी गणेश चतुर्थीपासून कॅरम, बुद्धिबळ, अभिनय, नृत्य, इत्यादी उपक्रमांच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सहभाग घेण्यासाठी 8007382783 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.