3 एप्रिल रोजी युवासेनेचा जिल्हा रूग्‍णालयावर धडकणार मोर्चा

जिल्हा मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा राणेंचा प्रयत्न... सुशांत नाईक
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 31, 2023 16:53 PM
views 296  views

कणकवली : शिंदे-फडणवीस सरकारने रक्तपुरवठा सेवा शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. ठाकरे सरकारच्या काळात शासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर ४५० रुपये होता. आता हा दर ११०० रुपये करण्यात आला आहे. तर अशासकीय रक्त केंद्राकडे एका रक्त पिशवीचा दर १५५० रुपये करण्यात आला आहे. हे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसल्याने या दरवाढीविरोधात युवासेनेच्यावतीने ३ एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युवासेनेचे जिल्हाप्रुमख सुशांत नाईक यांनी दिली.शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा राणेंचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.


कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख उत्तम लोके, राजू राठोड, सचिन आचरेकर, तेजस राणे, ललीत घाडीगावकर, आदित्‍य सापळे आदी उपस्थित होते.


केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्यक सर्वच वस्तूंचे दर भरमसाट वाढविले आहेत. राज्य सरकारनेदेखील लोकांचा जीव वाचवणाऱ्या रक्तपिशवीची किंमत ११०० रुपये केली आहे. मात्र, या दरवाढी विरोधात युवासेनेमार्फत आक्रमक होत सरकारला जाब विचारला जाणार आहे.

रक्‍तपिशव्यांचा दरात झालेल्‍या प्रचंड दरवाढी विरोधात युवा सेनेतर्फे जिल्‍हा शासकीय रूग्‍णालयावर ३ एप्रिलला मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना युवा सेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज दिली. तर शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा प्रयत्‍न राणेंकडून सुरू असल्‍याचा आरोपही श्री.नाईक यांनी केला.


राज्‍यातील शिंदे फडणवीस सरकार हे असंवेदनशील आहे. रक्‍तपिशव्यांच्या दरात ४५० रूपयांवरून थेट ११०० रूपये एवढी वाढ करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्‍यामुळे याबाबत आम्‍ही केंद्र आणि राज्‍य सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु राज्‍य शासनाने त्‍याकडे दुर्लक्ष केले. एरव्ही राष्‍ट्रीय आंतरराष्‍ट्रीय विषयावर बोलणारे राणे आता महागाई आणि आरोग्‍याच्या प्रश्‍नावर मात्र गप्प आहेत. नाईक म्‍हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्गसाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले. आता शिंदे-फडणवीस सरकार असताना यांना जिल्ह्यातील आरोग्‍य यंत्रणा सक्षम का करता येत नाही. केंद्रात आणि राज्‍यातील कॅबिनेटमध्ये सिंधुदुर्गचे सूपूत्र आहेत. तसेच कणकवलीचे आमदारही सत्तेत आहेत. तरीही आरोग्‍याच्या दूरवस्थेकडे ही मंडळी दुर्लक्ष का करत आहेत. खरं तर राणेंनी आपलं मेडिकल कॉलेज काढले आहे.त्‍यामुळे त्‍यांना आता शासकीय मेडिकल कॉलेज बंद करायचं आहे,तशी त्‍यांची भूमिका दिसून येत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.