आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा तरुणांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

Edited by: मनोज पवार
Published on: September 19, 2024 05:37 AM
views 234  views

सिंधुदुर्गनगरी : महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील 6 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणा-या या केंद्राचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 20 सप्टेंबर  रोजी दुपारी 12.30 वाजता वर्च्युअल/ आँनलाईन उद्धाटन  कार्यक्रम संपन्न होणार आहे. 

याअनुषंगाने जिल्हाधिकारी  अनिल पाटील  यांनी उद्घाटन कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यासाठी महाविद्यालयीन प्राचार्य व कॉलेज संपर्क प्रतिनिधी यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये वर्च्युअल/ आँनलाईन उद्धाटन कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलांनी घ्यावा तसेच 20 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणा-या कार्यक्रमास त्या त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी,  गावकरी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उद्घाटन सोहळा पार पाडावा असे आवाहन  अनिल पाटील यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर सांगुळवाडी, कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर सांगुळवाडी, मेट्रोपोलिटन इन्स्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजी अँण्ड मेनेजमेंट, मालवण, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली अशा 6 महाविद्यालयांच्या ठिकाणी उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत दरवर्षी 150 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.