चिपळूणात डिसेंबरला ‘युवा साहित्य संमेलन’

अध्यक्षपदी माधव भांडारी
Edited by: मनोज पवार
Published on: October 30, 2025 12:06 PM
views 19  views

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय (चिपळूण) यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबरमध्ये खास युवकांसाठी ‘युवा साहित्य संमेलन’ घेण्यात येणार आहे. आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त हे संमेलन घेण्यात येणार असून, संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नामवंत लेखक माधव भांडारी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी काम करण्यास मान्यता दिली आहे. वाचनालयाच्या या रौप्यमहोत्सवी समितीच्या अध्यक्षपदी लोकप्रिय आमदार शेखर निकम, उपाध्यक्षपदी माजी आमदार रमेश कदम, उद्योजक प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष सुचय रेडीज आणि चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले असून सर्वांनी संमेलनास सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. लेखक माधव भांडारी हे प्रभावी वक्ते आणि वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ते साहित्याचे आस्वादक, समीक्षक आणि संस्कृती-लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासकही आहेत. त्यांनी ‘अयोध्या’ (मराठी आणि हिंदी आवृत्ती), ‘१४ गारिबाल्डी स्ट्रीट’, ‘मागोवा दंतकथांचा’, ‘देश माझा, मी देशाचा’, मूर्ति दुजी ती (लेखसंग्रह), नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९, इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार, कलम ३७०, कुतुबमिनार, प्रतिमा आणि वास्तव, पाकिस्तानच्या निर्मात्यांचे काय झाले?, दृष्टीकोन आदी ग्रंथांचे लेखन केले आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष संतोष गोनबरे, कार्याध्यक्ष धीरज वाटेकर यांचेसह संमेलन समितीतील सदस्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.