
देवगड : देवगड हडपीड येथील अपघातात एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. देवगड- नांदगाव महामार्गावरील हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिरासमोरील अवघड वळणावरील रस्त्यावर विरुद्ध दिशेने जात दुचाकीने रिक्षाला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार विनायक धोंडू पुजारे (वय २२, रा. कोटकामते आडिवरेवाडी) हा जागीच ठार झाला.तर दुचाकीवरील त्याचा सहप्रवासी निखिल नारायण नवलू (वय २४, रा. कोटकामते आडिवरेवाडी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री १.१५ वा. च्या सुमारास घडली.पोलिसांन कडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे कोळोशी वरचीवाडी येथील रिक्षाचालक बाळकृष्ण नागोजी खरात हा आपल्या ताब्यातील रिक्षाने (एम. एच. ०७, एएच २५३७) बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवगड येथून कोळोशी येथे जात होता. तर कोटकामते आडिवरेवाडी येथील विनायक पुजारे हा आपल्या ताब्यातील दुचाकीने निखिल नवलू याच्यासमवेत नांदगावहून कोटकामतेच्या दिशेने जात होता. देवगड- नांदगाव मार्गावरील हडपीड येथील कुलस्वामिनी मंदिरासमोरील एका अवघड वळणावर भरधाव वेगाने असलेल्या विनायक पुजारे याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जात समोरुन येणाऱ्या बाळकृष्ण खरात यांच्या रिक्षाला दुचाकीची जोरदार धडक बसली.हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार विनायक पुजारे हा जागीच ठार झाला. दुचाकीवर त्याच्या मागे बसलेला निखिल नवलू याला गंभीर दुखापत झाली.तर रिक्षाचालक बाळकृष्ण खरात याला किरकोळ दुखापत झाली.स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ तेथे मदतकार्य राबवून गंभीर जखमी अवस्थेतील निखिल नवलू यालाउपचारासाठी हलविले.त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस हवालदार गणपती गावडे व योगेश महाले यांनीमध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. गुरुवारी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विनायक पुजारे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.घटनेची फिर्याद रिक्षाचालक बाळकृष्ण खरात यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.विनायक पुजारे हा गावात मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्याकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.










