
दोडामार्ग: चंदगड तालुक्यातील हत्ती पुन्हा दोडामार्ग तालुक्यात दाखल झाले असून बांबर्डे-घाटीवडे या परिसरात चक्क रस्ता ओलांडताना हे हत्ती दिसून आले. येथील स्थानिक दत्ताराम देसाई हे रस्त्यावरून जात असताना गणेश टस्कर व मादी पिल्लू रस्ता ओलांडत होते. यावेळी त्यांना पाहून दत्ताराम देसाई यांनी तेथून पळ काढला व हत्तीची छबी मोबाईलमध्ये कैद केली. हत्ती पुन्हा आल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मोर्ले येथे एका शेतकऱ्याचा बळी घेतलेला ओंकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात व लगतच्या गोवा परिसरात उच्छाद मांडत आहे. तिलारी खोऱ्यात वावरणाऱ्या सहा हत्तींच्या कळपापैकी ओंकार स्वतंत्र झाला असून उर्वरित पाच हत्ती हे घाटमाथ्यावर चंदगड तालुक्यात निघून गेले होते. मात्र महिन्याभरापूर्वीच हे हत्ती हेवाळे परिसरात दाखल झाले होते. त्यानंतर ते पुन्हा माघारी गेले. त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व कामे उरकून घेण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई हे दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गावरून प्रवास करत असताना त्यांना गणेश टस्कर व एक पिल्लू रस्ता ओलांडताना दिसले. त्यांना पाहून जीवाच्या भीतीने त्यांनी दुचाकी सोडून तेथून पळ काढला. दोन्ही हत्तींनी निवांतपणे रस्ता ओलांडला. यावेळी दत्ताराम देसाई यांनी दुरूनच हत्तींचे व्हिडिओ व फोटो मोबाईल मध्ये कैद केले. हत्ती पुन्हा या परिसरात दाखल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्तींना वेळीच वनविभागाने हाकलवावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.










