कुडाळमध्ये अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागाचा मोठा हातोडा!

कर्ली नदी पात्रातील ५ अनधिकृत रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 04, 2025 22:51 PM
views 45  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीच्या पात्रात होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननावर महसूल विभागाने आज मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतुकीसाठी नदीच्या काठावर उभारण्यात आलेले वालावल, नेरूर-नाईकवाडी, चेंदवण, कवठी आणि सरंभळ या भागातील सर्व अनाधिकृत रॅम्प (वाळू भरण्यासाठीचे मार्ग) प्रशासकीय पथकाने जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत.

ही धडक मोहीम मा. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे आणि तहसिलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

कर्ली नदीच्या काठावर व पात्रात अनेक दिवसांपासून वाळू माफियांनी अनधिकृत उत्खनन सुरू केले होते. यामुळे नदीचे पर्यावरण धोक्यात येत होते, तसेच शासनाचा महसूल बुडत होता. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर वचक बसला असून, नदीच्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.

यापुढेही अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.