तिलारी रिंग रोड कामाला धरणग्रस्तांचा विरोध ; उबाठाचे भिवा गवस आक्रमक

मोबदला मिळेपर्यंत कामास विरोधाची भूमिका
Edited by:
Published on: December 04, 2025 19:58 PM
views 147  views

सावंतवाडी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रिंग रोडसाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने उबाठा शिवसेनेचे सासोली विभागप्रमुख व पाटये ग्रामपंचायत सदस्य भिवा गवस यांनी  तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, पाट्ये, पाल, सरगवे, आयनोडे, शिरंगे परिसरातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीवरून रिंग रोड रस्त्याचे काम सुरू असून त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा नाही. उलट या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वनविभागाची जमीन अदलाबदल करून प्रश्न निकाली काढला असताना धरणग्रस्त शेतकऱ्यांकडे मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच यापूर्वी गावठाण वसाहत, प्लॉट वाटप, वनटाइम सेटलमेंट, पर्यायी जमीन आणि पुनर्वसन खात्याने वाटप केलेल्या शेत जमिनीकडे जाण्यासाठी रस्ता आदी मागण्या प्रलंबित असून त्या निकाली न निघेपर्यंत रिंग रोडचे काम थांबवावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

जर शासनाने तातडीने न्याय दिला नाही तर येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी तिलारी रिंग रोडवर सर्व धरणग्रस्त उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.