आंघोळ करण्यासाठी गेला तो परतलाच नाही

युवकाचा नदीत बुडून मृत्यू
Edited by: भरत केसरकर
Published on: April 07, 2023 20:17 PM
views 455  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे खुटवळवाडी येथील १७ वर्षीय श्रावण कृष्णा मराठे या युवकाचे रांगणातुळसुली येथील नदीच्या कोंडीत पाण्यात बुडून मृत्यू झाला. आंघोळी करण्यासाठी तो आपल्या काका आणि मित्रांसोबत या ठिकाणी गेला होता.

घावनळे खुटवळवाडी येथील श्रावण मराठे हा युवक त्याचा काका राजेश मराठे आणि मित्रांसोबत आंघोळी करण्यासाठी जवळ असलेल्या रांगणातुळसुली या गावातील नदीपात्रातील कोंडीमध्ये गेले होते. आंघोळी करत असताना श्रावण हा युवक पाण्यात बुडाला. त्याला पाण्यातून बाहेर काढून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. श्रावण मराठे हा तुळसुली हायस्कूलमध्ये ११ वीमध्ये शिकत होता. त्याचे वडील मोलमजुरी करतात. तर आई आणि बहीण मुंबई येथे असतात. त्याचा काका मुंबई येथे कामाला असून काही दिवसांसाठी तो गावी आला होता.

दरम्यान हे सर्वजण आंघोळीसाठी रांगणातुळसुली येथील नदीपात्रातील कोंडीत गेले होते. त्या ठिकाणी ही घटना घडली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात श्रावण मराठे याचा काका राजेश मराठे यांनी फिर्याद दिली आहे.