LIVE UPDATES

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

Edited by: लवू परब
Published on: May 21, 2025 20:44 PM
views 695  views

दोडामार्ग : विजेचा धक्का लागून एका अविवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कळणे येथे बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रताप रामराव देसाई, वय 29 असे युवकाचे नाव आहे. त्याच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रताप देसाई यांच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांनी घरातील सर्व सामान त्यांच्या चुलत्यांच्या घरी वरच्या मजल्यावर ठेवले होते. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस मुसळधार पाऊस असल्याने सामान भिजले तर नसावे ना हे पाहण्यासाठी ते वर गेले. मात्र बराच वेळ ते माघारी परतले नाही म्हणून कुटुंबीय त्यांना पाहण्यासाठी गेले. यावेळी प्रताप जमिनीवर निपचित पडले असल्याचे दिसले. त्यांनी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची काहीच हालचाल नसल्याने त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले असता तो रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

प्रतापच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तो गोव्यात एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका, काकी व चुलत भाऊ असा परिवार आहे.