
वैभववाडी : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र, वैभववाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शहरात मोटरसायकल रॅली काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ उपसभापती साची कोलते यांनी श्रीफळ फोडून केला.यावेळी सभापती सिद्धेश रावराणे,गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे , संरक्षण अधिकारी मिलन कांबळे तसेच तालुक्यातील पोलीस कर्मचारी, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका आणि महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली वैभववाडी पंचायत समिती ते दत्त मंदिरापर्यंत काढण्यात आली. या रॅलीद्वारे मुलींचे शिक्षण व संरक्षण याबाबत जागृतीचा संदेश देण्यात आला.










