कणकवली नगरपंचायतीची स्थायी समिती गठीत

सत्ताधारी पक्षाचे तीन सदस्य | विरोधी गटाचे दोन सदस्य
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 17, 2026 19:42 PM
views 23  views

कणकवली : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आदेशाने मंगळवारी झालेल्या कणकवली नगरपंचायतीच्या विशेष सभेत अखेर स्थायी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सत्ताधारी क्रांतिकारी विचार पक्ष अर्थात कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षांसह तीन सदस्य तर भाजपच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. 

१० फेब्रुवारी रोजी विविध विषय समिती स्थापन करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, या सभेत विषय समिती स्थापन न करण्याचा निर्णय ईश्वर चिठ्ठीने झाला होता. परंतु स्थायी समिती स्थापन करावी, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी केली होती. त्या सभेत कोणतीही विषय समिती स्थापन न झाल्याने स्थायी समिती स्थापन करण्याकरिता पदसिद्ध सदस्य उपलब्ध झाले नाहीत. विषय समिती स्थापन न करता स्थायी समिती स्थापन करण्यास विरोध गटाने आक्षेप घेतला होता. यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली होती. त्यावेळी पीठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्थायी समिती स्थापन करण्याचा निर्णय राखून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी स्थायी समिती स्थापन करण्यासाठी विशेष सभा लावण्याची सूचना केली होती. त्यानुसार न. पं. प.पू. भालचंद्र महाराज सभागृहात पीठसन अधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थिती विशेष सभा झाली. 

यात सभेत सुरुवातीला स्थायी समितीचे पाच सदस्य असतील, तसेच सभापती नगराध्यक्ष हे असणार असल्याचे श्रीमती पाटील यांनी जाहीर केले. तर कोणत्याही विषय समित्या अस्तित्वात नसल्यास उपनगराध्यक्ष हे सदस्य असतील, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले. तसेच न. पं. मधील सत्ताधारी व विरोधक यांच्या गटातील संख्याबळानुसार प्रत्येकी एक सदस्य समितीत घेता येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच गटनेत्यांनी आपल्या गटातील सदस्याचे नाव सुचविण्यास सांगितले. त्यानुसार क्रांतिकारी विचार पक्षाकडून रुपेश नार्वेकर यांनी स्वत:चे नाव सुचविले. तर भाजपच्या गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी मेघा गांगण यांचे नाव सुचवले. त्यानंतर उर्वरित एका सदस्यासाठी ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार ईश्वरी चिठ्ठी काढण्याचा मान ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत भावे यांना देण्यात आला. त्यांनी काढलेल्या चिठ्ठीत भाजपचे नाव आले. त्यामुळे गटनेत्या सुप्रिया नलावडे यांनी आपल्या गटातील संजय कामतेकर यांचे नाव सुचविले, अशारितीने शांततेत पाच सदस्यांची स्थायी समिती गठीत करण्यात आली. 

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सत्यजित उर्फ बाळू पारकर, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर,संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे, सुप्रिया नलावडे, बंडू हर्णे, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्नील राणे, मेघा गांगण, आर्या राणे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, प्रतीक्षा सावंत आदी उपस्थित होते.