ओरोशीत धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्मरण अभिवादन कार्यक्रम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 17, 2026 20:28 PM
views 23  views

सिंधुदुर्गनगरी : धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी  ६.३० ते ८.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, ओरोस फाटा येथे विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी राजे यांचे बलिदान हिंदूंसाठी अविस्मरणीय तितकेच प्रेरणादायी आहे. 

स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या धर्मवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा मराठी महिन्याच्या तिथीनुसार चा एक महिन्याचा कालावधी धर्मवीर संभाजी राजे बलिदान मास म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. 

यावर्षी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात हा अभिवादन मास कार्यक्रम घेण्यात आला. फाल्गुन अमावस्या 18 मार्च रोजी असल्याने या कार्यक्रमाची सायंकाळी सांगता होणार आहे. यानिमित्त ओरोस भवानी मंदिर ते ओरोस फाटा अशी मूकपदयात्रा होणार आहे. त्यानंतर शिवाजी महाराज पुतळा येथे संभाजी महाराजांना अभिवादन केले जाणार आहे. यावेळी सर्वांनी एकत्र यावे आणि या  स्मरण कार्यक्रमाच्या माध्यमातून  इतिहासातील प्रेरणादायी वारसा तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.