
बांदा : गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतूकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने गगनबावडा येथे कारवाई करत १८ लाख, ५७ हजार, ६०० रुपये किंमतीच्या दारुसह एकूण २७ लाख ५७ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अक्षय अशोक शिरवणकर (वय ३१, रा. सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बांदा चेकपोस्टसह पुढे इतके चेकपोस्ट असताना सिंधुदुर्गातून हा ट्रक पुढे गेलाच कसा, असा सवाल उपस्थित होतोय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने ट्रकमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलूजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने गगनबावडा येथे सापळा रचला होता.
याठिकाणी कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक (एम. एच. ०४ एच. वाय. ८३४४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. ट्रकच्या मागील हौद्यात कागदी पुठ्ठ्याच्या खोक्यात गोवा बनवटीच्या विविध ब्रँडचे १८० मिली मापाच्या बारा हजार सिलबंद बाटल्या असे एकूण २०० खोके जप्त करण्यात आले. पथकाने १८ लाख ५७ हजार ६०० रुपये किंमतीची दारू व ९ लाख रुपये किंमतीचा ट्रक जप्त केला. अधिक तपास कोल्हापूर विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलूजे करत आहेत.