
सिंधुदुर्गनगरी : कसाल-तेलीवाडी येथील ओंकार भिकाजी तेली (३२) या तरुणाने राहत्या घराच्या पडवीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान याबाबतच्या तपासात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून यात काही व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.
कसाल-तेलीवाडी येथील ओंकार तेली हा दिवसा कसाल येथीलच एका लोणचे बनविण्याच्या कंपनीत काम करायचा. तर रात्री बँकेच्या एटीएमकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून पहारा देत होता. सोमवारी १२ रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे सिक्युरिटी गार्डची नाईट ड्युटी करुन घरी आला. त्यानंतर कोंबडी सोडायला जातो, असे घरच्यांना सांगून गेला. मात्र, त्यानंतर काही वेळातच घराच्या पडवीत गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे घरातील माणसांच्या निदर्शनास आले.
चिंतामणी तेली यांनी याबाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिसात दिली. पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज पाटील, हवालदार अॅडवर्ड बुतेलो, रुपेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा व पुढील कार्यवाही केली. यावेळी सरपंच राजन परब, पोलीस पाटील अनंत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ओंकार तेली याने आत्महत्या केलेले ठिकाणी एक चिट्ठी आढळली असून यात काही जणांची नावे नमूद असून यांच्या सततच्या त्रासामुळे आपण कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चिठ्ठीच्या आधारे तपास केला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेबाबत पुढील तपास हवालदार कोमल नागरगोजे करीत आहेत. मयत ओंकारच्या पश्चात दिव्यांग वडील, चुलत भाऊ, काका-काकी असा परिवार आहे.










