
सावंतवाडी : जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या 58 वर्षा पासून 85 वर्षाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रत्नसिंधू जलसंपदा मित्र परिवाराच्या ग्रुपने एकत्र आणण्याचे जे काम केले आहे ते काम नक्कीच कौतुकास्पद आहे. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून कित्येक वर्षे पाटबंधारे विभागात एकत्र काम केलेले कर्मचारी आज अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र भेटत आहेत. हे एक पुण्याचे काम तुम्ही केले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा विभागाचे माजी सचिव देवेंद्र प. शिर्के यांनी काढले. रत्नसिंधू जलसंपदा परिवार (सेवानिवृत्त) या ग्रुपचे दुसरे स्नेहसंमेलन कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे रविवारी आयोजित केले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून श्री. शिर्के बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे माजी मुख्य अभियंता श्री. बी. बी. पाटील, माजी मुख्य अभियंता श्री. सुभाष वाघमारे, माजी मुख्य अभियंता श्री. प्रकाश अबनावे, माजी मुख्य अभियंता श्री. सुनील काळे, माजी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र संकपाळ, माजी कार्यकारी अभियंता बांदेकर साहेब, माजी कार्यकारी अभियंता लवेकर साहेब, माजी उपविभागीय अधिकारी श्री दत्ताराम सडेकर, माजी आरेखक श्री. बापू कुबल उपस्थित होते.
अभियंता श्री. विश्वेश्वरय्या व लक्ष्मीदेवीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तर ७५ वर्षात पदार्पण केलेल्या बंधू भगिनी सभासदांचा यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वात ज्येष्ठ सभासद श्री. दत्ताराम सडेकर वय वर्षे ८५ व श्री. बापू कुबल यांचा प्रथम सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी मुख्य अभियंता श्री. बी. बी. पाटील म्हणाले, जीवनातील आनंद लुटण्यासाठी या वयात अशा उपक्रमांची नक्कीच आवश्यकता आहे. अनेक वर्षांनी जो मित्रपरिवार जमतो त्यातून अनेक आठवणींना उजाळा मिळतो. त्यामुळे जीवनाला नवीन ऊर्जा निर्माण होते. आज या स्नेहसंमेलनाला उपस्थिती असलेल्याना पाहून सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. यावेळी जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आजची प्रगती व कर्मचाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन हा चांगला उपक्रम आहे, असे श्री. पाटील म्हणाले.
आपल्या पाटबंधारे प्रकल्पातील सेवानिवृत्त लोकांचा एवढ्या मोठ्या ग्रुप आहे. आपण एक एनजीओ बनवून त्याद्वारे काही उपक्रम हाती घ्यावेत. त्याला लागणारे सहकार्य आम्ही नक्कीच करू, असे आश्वासन यावेळी माजी मुख्य अभियंता श्री. प्रकाशा अबनावे यांनी दिले. यावेळी माजी मुख्य अभियंता श्री. सुभाष वाघमारे व माजी अधीक्षक अभियंता राजेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला विशेष सहाय्य करणारे कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव व उपविभागीय अधिकारी श्री. मंगेश माणगांवकर यांचा खास सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता/अधिकारी तसेच तांत्रिक /अतांत्रिक, असे ३०० च्या वर सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ईशास्तवन-स्वागत गीत सादरीकरण- सौ. रश्मी वालावलकर आणि भगिनींनी केले. श्री. राजू तावडे यांनी प्रास्तावित केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम चव्हाण यांनी केले.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात सर्वांनी छान सादरीकरण केले. श्रीकांत ढालकर यांचा बोलका बाहुला, लोहोकरे यांचे गीते, कुरणे यांचे बासरी वादन लक्षवेधी होते. श्री. काळे यांनी किशोर कुमार यांची गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. राजू सावंत प्रभावळकर यांनी सर्वांना भगवे फेटे बांधून वातावरण भगवामय केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे श्रीराम चव्हाण, राजू तावडे, राजन वालावलकर, संजय शेणई, सुरेश वर्दम, रत्नकुमार दामले, ॲड. जयसिंग वारंग, मायकेल डिसोजा, सखाराम सपकाळ, कमलाकर साळगावकर, भास्कर पवार, गुरुनाथ केसरकर,उल्हास केसरकर, अंकुश गवस, प्रमोद तायशेटे, वासुदेव सडवेलकर, प्रदीप मुळे,अर्जुन आयनोडकर, नंदकुमार साळवी, भगवान केसरकर यांनी मेहनत घेतली.










