
मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग (NCC) अंतर्गत एनसीसी प्रशिक्षण घेतलेल्या व कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या आदेश हाके, बिरू खरात, विवेक पाटील आणि शंकर पाटील या चार कॅडेट विद्यार्थ्यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर मध्ये निवड झाली असून सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग व कृ. सि. देसाई शिक्षण मंडळ यांच्यासाठी ही गौरवास्पद बाब ठरली आहे. या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर.खोत यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
अग्निवीरमध्ये निवड झालेल्या या चारही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून प्रतिकूल परिस्थितीतून ते शिक्षण घेत आहेत. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगून या चौघानीही मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसीसाठी प्रवेश घेतला, त्यांच्या मेहनतीमधून त्यांचा हा उद्देश फळाला आला आहे, असे एनसीसी विभाग प्रमुख मार्गदर्शक प्रा. एम. आर. खोत यांनी सांगितले.
या यशाबद्दल कॉलेजचे विद्यमान प्रभारी प्राचार्य कैलास राबते, माजी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे व इतर संस्था पदाधिकारी यांनी या चारही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनीही अभिनंदन करत मालवणसाठी ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले. ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेकर - तामिळनाडू, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर, सुभेदार यांनीही अभिनंदन केले.










