कणकवलीतील अवैध धंदे बंद न केल्‍यास आंदोलन

भाजप शहराध्‍यक्ष अण्‍णा कोदेंचा पोलिसांना इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 13, 2026 20:28 PM
views 67  views

कणकवली : कणकवली शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. याबाबत वेळोवेळी माहिती देऊनही पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अवैध धंदे तात्‍काळ बंद करावेत. अन्‍यथा शहर भाजपच्‍यावतीने आंदोलन करण्‍याचा इशारा भाजपचे शहराध्‍यक्ष सुरेंद्र उर्फ अण्‍णा कोदे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्‍वारे दिला. निवेदन सादर करतेवेळी औदुंबर राणे, निखिल आचरेकर, उदय यादव, कल्‍याण पारकर आदी उपस्‍थित होते. 

निवेदनात म्‍हटले आहे, मटका, जुगार, ऑनलाईन केसिनो, गुटखा, गोवा दारू व गांजा, चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याबाबत पोलिसांना आम्‍ही वेळोवेळी माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. परिणामी अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरूण पिढी देखील व्‍यसनांच्‍या आहारी जाऊन बरबाद होत आहे. याची गंभीर दखल घेऊन हे धंदे ताबडतोब बंद करावेत. आठ दिवसात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास कणकवली शहर भाजपच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत, असे निवेदनात म्‍हटले आहे.