
सावंतवाडी : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी सामाजिक आणि आर्थिक भान राखत सांस्कृतिक उत्तरदायित्व जपण्याचे कार्य करत आहे. ही संस्था आणि तिच्याशी संलग्न संस्था युवकांना रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. लोक-सिंधु महोत्सवाचे आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीला हातभार लावण्यासोबतच, येथील लोककलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम या संस्थेने केले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव-सावंतवाडी येथे 'लोक-सिंधु' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर-बिजलानी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, दामोदर वागळे, सल्लागार प्रीतम बिजलानी, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सिंधु सुंदरी’, ‘फॅशन शो’ आणि ‘खेळ पैठणीचा’ यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा पार पडल्या.या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात मूर्तिकार विलास माळगावकर, प्रगतशील शेतकरी प्रमोद दळवी, डॉ. प्रवीण कुमार ठाकरे (सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान) प्रा. सतीश बागवे आणि सहकारी (सामाजिक बांधिलकी) सुहानी गावडे (सरपंच, विलवडे), उद्योजक रघुवीर मंत्री, सुधीर नाईक, बादल चौधरी, विराज मडकईकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन साक्षी मयेकर यांनी केले. महोत्सवात लावण्यात आलेल्या खाद्य स्टॉल्स आणि पुस्तक प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.










