शासनाच्या योजना जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचव्यात यासाठी प्रयत्न : शुभांगी साठे

वेंगुर्लेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचा शुभारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: March 07, 2026 21:30 PM
views 17  views

वेंगुर्ला : आम्ही प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या सेवा जनतेला देत असतो. शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. शासनाच्या या समाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेचे या शिबिरात सहभाग घेऊन विविध योजनांची माहिती करून घ्यावी. तालुकास्तरीय अधिकारी या शिबिरात उपस्थित असणार आहेत. जनतेने आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. बऱ्याच वेळी विविध नागरिकांना दाखल्यांसाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालावे लागतात. वाहनांची व्यवस्था नसते. या सर्वाचा विचार करून शासनाच्या निर्देशानुसार ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी वेतोरे येथे केले. 

   महसूल विभागा अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख गतिमान व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे मंडळात आयोजित करण्यात आलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात" श्रीमती साठे बोलत होत्या. या शिबिराचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी समीर घारे, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, जि प सदस्य विजय नाईक, पं स सदस्य नितीन मांजरेकर, वेतोरे सरपंच प्राची नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील,  केळुस सरपंच योगेश शेटये, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वेतोरे सोसायटी चेअरमन उत्तम वालावलकर, कृषिभूषण संतोष गाडगीळ, एम. के. गावडे आदी उपस्थित होते. 

   या कार्यक्रमात वेतोरे मंडळातील विविध नागरिकांना दाखल्यांचे वितरण, घरकुल योजनेच्या लाभार्त्याना घरकुल चावी वितरण, दिव्यांग दाखले वितरण, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, नजराणा आदेश वाटप, ३२ म प्रमाणपत्र, संजीव गांधी निराधार योजना , यु आय डी कार्ड आदी वितरण करण्यात आले. या शिबिरात केंद्रशाळा वेतोरे नंबर १ चा विद्यार्थी समर्थ मेस्त्री याने सिंधुदुर्ग किल्ल्याचे स्वतः काढलेले चित्र श्रीमती साठे यांना भेट देण्यात आले. या शिबिरात शासनाच्या वतीने विविध विभागाचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. याला सर्व मान्यवरांनी भेट देत माहिती घेतली. 

   यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी श्रीम. देसाई म्हणाल्या आपल्या दैयनंदिन जीवनातील काही गोष्टी या महसूल विभागाशी निगडित असतात. जनसामन्यापर्यंत या योजना पोचवण्यासाठी शासन नेहमीच तत्पर असते. शासन आपल्या परीने विविध योजना राबवत असत मात्र जनतेकडून सुद्धा प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. यामुळे तरुण पिढीला शासनाच्या योजना माहीत होण्यासाठी त्यांना हा प्रवाहात आणा असे आवाहन त्यांनी केले. तर बाळ राडल्याशिवाय  आई दूध पाजत नाही तसं शासन आपल्या दरी आलं आहे. यामुळे तुम्हाला काय हवं, तुमचा हक्क काय आहे, तुमच्या मुलाना भविष्यात काय पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे असे आवाहन प्रांत समीर घारे यांनी केले. तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रास्ताविक करताना अभियानाची माहिती देत या अभियानात कोणते लाभ घेता येतील त्याबाबत सांगितले. मान्यवरांचे स्वागत मंडळ अधिकारी क्रांती निग्रे, सूत्रसंचालन वेतोरे शाळा नंबर १ चे उपशिक्षक राजन राटूळ तर आभार प्रदर्शन तलाठी चारुशीला वेतोरकर यांनी केले.