
दोडामार्ग : सासोली ग्रामपंचायत परिसरातील बागायतीत शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गेल्याने परिसरातील काजू कलमे व जळाऊ लाकूड जळून मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील कचऱ्याला आग लावण्यात आली होती. मात्र जोरदार वाऱ्यामुळे ही आग नियंत्रणाबाहेर जात इतर ठिकाणी पसरली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. ही आग क्षणार्धातच काजू बागायतीत पसरली. येथे ठेवण्यात आलेल्या जळाऊ लाकडांनी आगीने वेढले.
दरम्यान, कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करण्यात आले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण तसेच माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांच्या सहकार्याने अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला.
अग्निशमन दलाच्या तत्पर प्रयत्नांमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी अंकुश नाईक, सोमेश गांजील, मनोज गवस, विशाल चव्हाण, सर्वेश देसाई, कल्पेश गांजील, सर्वेश परब, दिप्तेश गवस, निखिल ठाकूर तसेच ग्रामस्थांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. ग्रामस्थांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी दिलेल्या तात्काळ सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.











