
सावंतवाडी : कोकण रेल्वेकडून सावंतवाडीकरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तसेच बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्यासह सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कार्यान्वित करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला सावंतवाडी करांच्या मागण्यांसाठी कोकण रेल्वे विरूद्ध साखळी आंदोलन करणार असल्याचा इशारा मिहीर मठकर यांनी दिला आहे. या आंदोलनाला युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा नसल्यानं सावंतवाडीकर जनतेला कुडाळवारी करावी लागत आहे. एक्स्प्रेसनं मुंबईला ये-जा करायची असेल तर कुडाळला जावं लागतं आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा अशी मागणी आहे. वारंवार लक्ष वेधून कोकण रेल्वे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिहीर मठकर यांनी सावंतवाडीकरांच्यावतीन साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे याला आमच्या संघटनेसह युवकांचा देखील पाठिंबा आहे. मोठ्या संख्येने युवा वर्ग या साखळी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती देव्या सुर्याजी यांनी दिली.