कंत्राटी शिक्षक भरतीसाठी युवा बेरोजगारांना संधी द्यावी : मनोज उगवेकर

Edited by: दिपेश परब
Published on: July 11, 2023 15:26 PM
views 220  views

वेंगुर्ला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करता हे टाळण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ही रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात एवढे बेरोजगार तरुण असताना अशा सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेऊन काय साधायचे आहे ? असा सवाल शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर यांनी उपस्थित करत कंत्राटी पद्धतीवर या शिक्षक भरतीसाठी युवा बेरोजगारांना संधी देण्याची मागणी केली आहे. याबाबत आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचेही ते म्हणाले. 

या सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीची कमाल मर्यादा ७० वर्ष ठेवण्यात आली आहे. मात्र सेवानिवृत्त काही शिक्षक हे आपापल्या विविध समस्यांनी ग्रासलेले आहेत. शिवाय सेवा निवृत्त शिक्षकांना ४० हजारांच्या आसपास मासिक निवृत्ती वेतन येते. वास्तविक जिल्ह्यात लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची अत्यंत आवश्यकता असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून यातून शिक्षण विभागाला नक्की काय साधायचे आहे. याबाबत अनेक सुशिक्षित तरुण तरुणींमध्ये बाबत असंतोष पसरलेला आहे.  

त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हावा व जिल्ह्यातील तरुणांना नोकरीची संधी देऊन न्याय द्यावा  अशी विनंती असून याबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे मनोज उगवेकर यांनी सांगितले.