युवा चित्रकार अक्षय मेस्त्रींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 10, 2024 13:20 PM
views 91  views

देवगड : देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री यांना “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” ” देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. जनजागृती सेवा संस्था बदलापूर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” देवगड तालुक्यातील गवाणे येथील उद्ययमुख युवा चित्रकार अक्षय अश्विनी अरुण मेस्त्री याला बदलापूर येथे देऊन सन्मानित करण्यात आले.

जनजागृती सेवा संस्था हे गेल्या 3 वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. संस्थाचे 3वा वर्धापन दिनानिमित्त यावर्षी 55 सन्मानिय व्यक्तींची निवड करुन राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” सन्मानित करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

अक्षय मेस्त्री यांच्या अंगी असलेली चित्रकला जोपासत या चित्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत सामाजिक बांधिलकी जपत आल्याने तसेच जखमी प्राणी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडणे तसेच निसर्ग संवर्धनासाठी करीत असलेल्या जनजागृती कार्याचा गौरव म्हणून जनजागृती सेवा संस्था यांच्यावतीने प्रतिवर्ष दिल्या जाणाऱ्या. राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराकरिता अक्षय मेस्त्री याची निवड करण्यात आली होती.

जनजागृती सेवा संस्था यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच त्या त्या क्षेत्रात विशेष, उल्लेखनीय, समाजास भूषणावह परंतु प्रसिद्धी परामुख कार्य करणाऱ्या अश्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो.

नुकतेच या “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार वितरण सोहळा बदलापुरात त आयोजित करण्यात आला होता. अक्षय मेस्त्री यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” जनजागृती सेवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष गुरूनाथ तिरपनकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल अक्षय मेस्त्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.