युवा संगीतकार संकेत शिर्के यांना ‘क्लेफ म्युझिक अवॉर्ड्स 2025’ने सन्मानीत

Edited by: मनोज पवार
Published on: September 25, 2025 16:13 PM
views 118  views

मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ गावाचे सुपुत्र युवा संगीतकार संकेत शिर्के यांनी त्यांचे संगीत क्षेत्रात उत्तम कामगीरी करत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी गोरेगाव, मुंबई येथील वेस्टिन गार्डन मध्ये आयोजित ‘ क्लेफ म्युझिक अवॉर्ड्स 2025 ’ या कार्यक्रमात संकेत शिर्के यांना त्यांच्या ‘ विघ्नहर्ता तू मोरया ’ या भक्तिगीतासाठी सर्वोत्कृष्ट भक्तिगीत संगीत दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार रेडिओ अँड म्युझिक कंपनी व विविध नामांकित भागीदार संस्थांच्या वतीने प्रदान करण्यात आला.

 भारतीय संगीत क्षेत्रातील स्वतंत्र, विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘ क्लेफ म्युझिक अवॉर्ड्स ’ या मंचाचे हे  पुरस्कार वितरणाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. या वर्षी सन्मानित झालेल्यांमध्ये गुलजार, अनु मलिक, अनुप जलोटा, सोनू निगम, अरमान मलिक, वैशाली सामंत, शाल्मली खोलागडे यांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. २०२३ साली हा पुरस्कार दिग्गज गायक सोनू निगम यांना त्यांच्या ‘हनुमान चालीसा’साठी मिळाला होता. सोनू निगम हेच माझे संगीत प्रेरणास्थान असल्यामुळे त्याच पंक्तीत आपला सन्मान होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे संकेत शिर्के यांनी या निमीत्ताने सांगितले आहे. संगीतकार संकेत शिर्के यांच्या संगीत प्रवासाची सुरुवात जवाहर नवोदय विद्यालयात झाली. येथे त्यांना श्री.मुकेश कुमार मंजेरवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि संगीताबद्दलच्या आवडीतून त्यांनी अनेक उल्लेखनीय गीते संगीतबद्ध केली. 

यापूर्वी त्यांनी ‘ माझ्या विठ्ठला ’ (आदर्श शिंदे यांच्या आवाजात), ‘ जीव झाला बाजिंद ’ (मयूर सुकले यांच्या आवाजात), तसेच ‘ मन नाचरे’  अशी अनेक लोकप्रिय गीते संगीतबद्ध केली असून त्यांना श्रोत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळवला आहे. स्थानिक रहिवाशांनी व संगीतप्रेमींनी या यशाबद्दल कृतज्ञता व अभिमान व्यक्त केला असून, जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला मिळालेली ही गौरवशाली ओळख मानली जात आहे.