
मालवण : भूतान देशात पर्यटनासाठी गेलेला मालवण कुंभारमाठ येथील संगणक अभियंता शैलेश शिवाजी कांबळे (वय- ३२) या तरुणाचा वेंगडू झांपा ब्रिजवर झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकी नदीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ११ जुलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेनंतर तब्बल महिन्याभरानंतर, म्हणजेच १० ऑगस्ट रोजी भूतान येथेच त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील भंडारी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी केरबा कांबळे यांचा मुलगा असलेला शैलेश १ जुलै २०२६ रोजी भूतान सहलीसाठी रवाना झाला होता. मूळ नियोजनानुसार त्याची सहल ६ जुलैपर्यंत होती; मात्र पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्याने रीतसर परवानगी घेऊन ११ जुलैपर्यंत मुक्काम वाढवला होता. ११ जुलै रोजी तो भारतात परतणार होता. मात्र, त्याच दिवशी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास भूतानमध्ये भाड्याने घेतलेल्या दुचाकीचा वेंगडू झांपा ब्रिजवर अपघात झाला आणि तो पुलावरून थेट खाली वाहणाऱ्या नदीच्या पात्रात कोसळला.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून अपघाताची धक्कादायक बातमी मिळताच कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शैलेशचा तातडीने शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रशासनामार्फत भारतीय दूतावासाकडे मदतीची याचिका केली. दरम्यान, शैलेशचे वडील शिवाजी कांबळे व नातेवाईकांनी तातडीने भूतान गाठले. वांगडू पोलिसांनी सुरु ठेवलेल्या शोधमोहिमेदरम्यान काही दिवसांनी शैलेशचा मृतदेह सापडला. कायदेशीर प्रक्रिया आणि ओळख पटवल्यानंतर भूतान प्रशासनाने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. १० ऑगस्ट रोजी कांबळे कुटुंबीयांच्या उपस्थितीत भूतानमध्येच शैलेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शैलेश हा संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. ऐन तारुण्यात आणि अशा दुर्दैवी प्रसंगी त्याचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण मालवण शहरात आणि कुंभारमाठ परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.










