
सावंतवाडी : युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून युवकांनी हृदय शस्त्रक्रियेवेळी तीन गरजू रूग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचा आदर्श घालून दिला आहे. गोवा बांबोळी आणि लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे रुग्णांना शस्त्रक्रियेवेळी तातडीने रक्ताची आवश्यकता असताना, युवा रक्तदाता संघटनेच्या युवकांनी पुढे सरसावत रक्तदान केले.
गोवा-बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या गुरुनाथ नाईक (रा. आरोस) यांना A+ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची तातडीने गरज होती. यावेळी माजगाव येथील जीवन सावंत आणि सावंतवाडी येथील गोपाळ गोवेकर यांनी बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या योगदानामुळे रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे, याच रुग्णालयात दाखल असलेल्या गितांजली घाडी (रा. तळकट, दोडामार्ग) या महिला रुग्णाला सर्जरीदरम्यान A+ पॉझिटिव्ह रक्तगटाची गरज होती. त्यावेळी सावंतवाडी येथील गौरव कुडाळकर यांनी रक्तदान केले.
दरम्यान, पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रियेदरम्यान एका रुग्णाला O+ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ५ युनिट रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी संदीप निवळे, संदेश नेवगी, वसंत सावंत, रुझारिओ फर्नांडिस आणि स्टेनली अरान्जो यांनी रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचवले.गेली अनेक वर्षे संघटनेच्या माध्यमातून देव्या सूर्याजी हे रुग्णांसाठी रक्तदूत बनून कार्य करत आहेत.सर्व रक्तदात्यांचे युवा रक्तदाता संघटनेने आभार मानले असून, त्यांचे अभिनंदन केले आहे.युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी या सर्व तिन्ही रुग्णांच्या रक्ताच्या पुर्ततेसाठी विशेष परिश्रम घेतले.