
देवगड : देवगड येथे आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थिती लक्षात घेता मोफत अन्नधान्याचे वितरण जून ते ऑगस्ट या तीन महिन्याचे एकाचवेळी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडून करण्यात आल्या आहेत.
आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या मोफत अन्नधान्याचे वितरण एकाचवेळी करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांना करण्यात आल्या आहेत. तसेच हे वितरण 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजिस्टीक्स आणि साठवणुकीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट २०२५ पर्यंत एन. एफ. एस. अंतर्गत वाटप केलेल्या अन्नधान्याची आगाऊ उचल करण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तीन महिन्याचे धान्य तात्काळ उचल करून लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत धान्य वाटप पूर्ण करावयाचे आहे. तसेच रास्त भाव धान्य दुकानारांनी महिन्याचे व्यवहार व प्रमाणीकरण स्वतंत्रपणे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी देवगड तहसीलदार कार्यालयात तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांची बैठक घेऊन शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांसाठीचे नियमित मोफत अन्नधान्याचे तालुकानिहाय मंजूर नियतन प्राप्त झालेली असून सर्व रास्त भाव धान्य दुकानदारांनी तात्काळ धान्य उचल करावयाचे आहे. तसेच ३० जूनपर्यंत धान्य वितरणाची कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून रास्त भाव धान्य दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.तसेच याकामी कुठलीही प्रकारची तक्रार प्राप्त होऊ नये, यासाठी रास्त भाव दुकानदारांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.