आ. योगेश कदम यांची महाविकास आघाडीवर सडकून टीका

Edited by:
Published on: November 08, 2024 19:34 PM
views 166  views

दापोली :  महायुतीच्या शासनाने राज्यातील भगिनींसाठी  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करून त्याद्वारे त्यांना दरमहा दीड हजार रुपये देण्यास सुरुवात केल्यावर या योजनेवर महाविकास आघाडीने टीका करून या योजेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याची आवई उठवली होती. मात्र, या योजनेचे यश पाहून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही दरमहा या योजनेतून महिलांना ३ हजार रुपये देवू असे आश्वासन दिले असून यामुळे आता राज्याचा तिजोरीवर भार पडणार नाही का असा तिरकस सवाल दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला आहे. 

दापोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आमदार योगेश कदम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत आज दापोली येथील  कोकंबा आळी येथे करण्यात आले. त्यानंतर आ. योगेश कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थीतित त्यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशनहि केले. त्यानंतर ते म्हणाले,  विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीच्या उमेदवारांनाच कौल देणार असून सरकार महायुतीचेच येणार असून त्यानंतर “व्हिजन महाराष्ट्र ” अंतर्गत १००  दिवसांच्या आत सरकार पुढील  विकासाचे  व्हिजन जनतेसमोर ठेवणार आहे.  सौर व अक्षय उर्जेवर भर देऊन वीज बिलात ३०  टक्के कपात करण्यात येणार असून  अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण,  राज्यातील ४५  हजार गावात पाणंद रस्ते, २५  लाख रोजगार निर्मिती, दहा लाख विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये विद्यावेतन, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे वचन, वृद्ध पेन्शन धारकांना १ हजर ५००  ऐवजी २ हजार १००  रुपये देण्याचे वचन, प्रत्येकास अन्न आणि निवारा देण्याचे वचन व शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५  हजार रुपये देण्याचे वचन महायुतीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोकाकोला प्रकल्प राज्याच्या बाहेर गेलेला होता तो आपण पुन्हा आपल्या राज्यात व जिल्ह्यामध्ये आणला आहे. यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार व कर्तव्य समजण्यातच अडीच वर्षे गेली. यामुळे यापुढे महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना स्वीकारणार नाही असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. दापोली विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे व्हिजन आपण महायुतीचे पदधिकारी यांचेबरोबर चर्चा करून लवकरच जाहीर करू असेही ते म्हणाले. 

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयवंत जाल, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय सावंत, जिल्हा सरचिटणीस भाऊ इदाते, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष प्रीतम रुके यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व आरपीआय महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.