
दापोली : दापोलीचे तत्कालीन आमदार बाबुरावजी बेलोसे यांच्या नंतर पुन्हा एकदा दापोलीच्या गळ्यात 49 वर्षांनी मंत्रीपदाची माळ पडली आहे. दापोलीचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी आज सायंकाळी नागपूर येथे राज्यमंत्री म्हणून पदाचीव गोपनीयतेची शपथ घेतली व दापोली विधानसभा क्षेत्रात एकच जल्लोष करण्यात आला.
दापोलीचे तत्कालीन आमदार बाबुराव बेलोसे हे महाराष्ट्र विधानसभेत 1975 मध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी बंदरे दारूबंदी खाते त्याचप्रमाणे मत्स्य व्यवसाय पर्यटन उत्पादन शुल्क आदी खात्यांचे राज्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांच्या पश्चात मात्र दापोलीला मंत्रीपद मिळालेले नव्हते. बाबुराव बेलोसे यांच्या नंतर दापोली तीन आमदार होऊन गेले. मात्र तीनही आमदारांना मंत्री पद मिळवता आलेले नव्हते. आमदार सूर्यकांत दळवी हे तर दापोली विधानसभेत पाच वेळा सलग आमदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांना पक्षाकडून वेळोवेळी मंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांचा त्यांना मंत्रिपदांनी हुलकावणी दिली जात होती. सहाव्यांदा ते विधानसभेकरिता उभे राहिल्यावर युतीची सत्ता आल्यावर त्यांना मंत्रीपद निश्चित मानले जात होते. मात्र त्यांचा नवख्या संजय कदम यांनी पराभव केला. यानंतर दापोलीच्या राजकारणात नव्याने उदय झालेल्या आमदार योगेश कदम यांनी सलग दोन वेळा संजय कदम यांचा पराभव केला व राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. योगेश कदम यांच्या निवडणुकीच्या प्रचारा करिता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दापोलीत आले असता त्यांनी योगेश कदम यांना तुम्ही पुन्हा आमदार करा मी त्यांना मंत्री करतो अशी भावनिक साद मतदारांना घातली होती. यानंतर मतदारांनी योगेश कदम यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून दिल्यावर आता दापोलीला मंत्रीपद नक्की मिळणार अशी दापोलीतील विधानसभा क्षेत्रात चर्चा सुरू झालेली होती. त्यानुसार आमदार योगेश कदम यांनी रविवारी सायंकाळी नागपूर येथे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दापोली विधानसभा क्षेत्रात एकच जल्लोष करण्यात आला.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोली येथे दिलेले आश्वासन पाळले याबाबत दापोलीतील शिवसेनिकांनी दापोली शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.योगेश कदम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर दापोली शिवसेना शाखेसमोर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाके लावण्यात आले. मिठाई वाटण्यात आली . शिवाय ना. योगेश कदम यांच्या मंत्रिपदाचा सोहळा दापोलीकरांना पाहता यावा याकरिता शिवसेना शाखेसमोर एलईडी स्क्रीनचे देखील आयोजन करण्यात आलेले होते. योगेश कदम आता राज्यमंत्री झालेले आहेत. त्यांना कोणते खाते मिळते याकडे दापोली करांच्या नजरा लागून राहिल्या राहिलेल्या आहेत. योगेश कदम हे 23 डिसेंबर रोजी दापोलीत येणार आहेत. यावेळी त्यांच्या नागरि सत्काराचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती युतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.