
दापोली : दापोली विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार द्या अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकार्यांनी अखेर शिवसेनेचे योगेश कदम यांना या निवडणुकीचे उमेदवार म्हणून स्वीकारले असून योगेश कदम व भाजपचे पदाधिकारी यांची एक बैठक काल दापोली येथे आयोजित करण्यात आली असून महायुती सत्तेत येण्यासाठी योगेश कदम यांना विजयी करण्यासाठी सूत्रबद्ध प्रचार यंत्रणा राबविण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
भाजपा नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी टीका केली होती. या टीकेला भाजपाकडून जशास तसे उत्तरहि देण्यात आले होते. त्यानंतर भाजपाने दापोली विधानसभा मतदार संघाच्या जागेवर आपला दावा केला होता. तर जागावाटपात ही जागा शिवसेनेला गेल्यावर या ठिकाणी योगेश कदम यांच्याऐवजी अन्य उमेदवार देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. योगेश कदम यांनी दापोली भाजपा म्हणजे केदार साठे नव्हे असे सांगत या वादात आणखी फोडणी टाकली होती. यावेळी केदार साठे यांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आम्ही मांडली यात चुक काय अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये समज-गैरसमज वाढले गेल्याने दोन्ही पक्षाच्या युतीमध्ये अंतर पडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात गोंधळलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही भाजपाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे दापोली विधानसभा मतदार संघामध्ये भाजपा ही शिवसेना पक्षाबरोबर नसल्याचे वारंवार दिसून येत होते.
या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदार संघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, दापोली तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर, खेड तालुका अध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस भाऊ इदाते, मंडणगडचे माजी तालुकाअध्यक्ष बावा लोखंडे, लवू साळुंके यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. योगेश कदम यांनी दोन्ही पक्ष हे राज्यामध्ये सत्तेत असून दोन्हीही पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे कोणतेही मतभेद नको आपल्याला महायुतीची सत्ता आणायची असून झाले गेले ते विसरून जावे असे सांगत महायुतीतील तणाव निवळावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावर भाजपाकडूनही सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. दोन्ही पक्षात मनोमिलन झाल्याने आता भाजपाचे पदधिकारी व कार्यकर्ते नेमका प्रचाराला कधीपासून सुरूवात करणार व आपल्यातील वाद मिटल्याचे कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.