योगेश कदमांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर !

Edited by: मनोज पवार
Published on: August 06, 2024 10:54 AM
views 346  views

मंडणगड : महसुल पंधरवड्याचे औचित्य साधून पंचायत समिती मंडणगड यांनी 6 ऑगस्ट 2024 ला आमदार कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा सभेत आंबडवे लोणंद या तालुक्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्गाचे कामांचे दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. 

या सभेस आमदार योगेश कदम, दापोलीचे उपविभागीय प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबले, तहसिलदार श्रीधर गालीपिल्ले, गटविकास अधिकारी विशाल जाधव, महामार्ग प्राधिकरणांसह विविध खात्यांचे अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुकावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. राष्ट्रीय महामार्गाचे भुसंपादन व मोबदला प्रक्रीया याबद्दल आढावा घेताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश घडवले यांनी महामार्ग बांधताना चुकीच्या कार्यपध्दतीचा व संबंधीत खाते व ठेकेदार व मनमानी कारभारीची वस्तुस्थिती समोर मांडली. कौस्तुभ जोशी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करत असताना, महामार्गासाठ जमिन अधिगृहण केलेली असताना मार्गावरील धोकादायक वळणे न काढताच रस्त्याचे बांधकाम केल्याने निर्माण झालेल्या विविध समस्या निदर्शनास आणून दिल्या. यावर आमदार योगेश कदम यांनी प्राप्त झालेल्या कागदपत्रांचे आधारे व रस्त्याचा डीपीआर पाहिल्यानंतर प्रत्यक्षात तसे काम न झाल्याचे पाहून अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले. 

याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तसेच चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेल्या कामामुळे झालेला शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीचा पंचनामा पाहणी करुन तयार कऱण्यास सांगीतले. सभेस उपस्थित अनेक शेतकऱ्यांनी संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांनी महामार्ग निर्मीतीचे नियमांना बगल देत केलेल्या महामार्गाचे कामामुळे महामार्ग हा मृत्यचा सापळा झाल्याचे सांगीतले. यावर आमदार व उपविभागीय अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांना तातडीने पाहणी करुन उपयोजनांची अंमलबजावणी कऱण्याचे सुचीत केले. यानंतर महसुल पंधरवड्याचे निमीत्ताने भारजा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल ही आपत्तकालीन परिस्थिती यशस्वीपणे हातळणाऱ्या ग्रामस्थ व आपत्ती निवारण पथकातील सर्व अधिकाऱ्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देत आमदार योगेश कदम यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. 

तसेच पुरवठा विभाग, कृषी विभाग, महावितरण, सार्वजनीक बांधकाम विभाग, एस.टी. महामंडळ, या विभागाशी संबंधीत नागरीकांकडून मांडण्यात आलेल्या प्रश्न व समस्या यावर चर्चा करुन संबंधीत यंत्रणांना समस्या दूर करण्याचे आदेश देण्यात आले. या कार्यक्रमांचे औचीत्यसाधून पावसात नुकसानग्रस्त झालेल्या आपत्तग्रस्तांना तातडीच्या मदतीच्या किट्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे आपत्तकालीन परिस्थितीत तालक्याचे तहसिलदार यांनी स्वत: रस्त्यावरुन उतरुन विविध समस्या मार्गी लावल्याबद्दल उपस्थित तालुकावासीयांच्यावतीने त्यांचे आभार मानून गौरव करण्यात आला.