
चिपळूण : “आपली बोलीभाषा बोलायला लाज बाळगू नका, तीच आपली ओळख आहे. आपण ग्रामीण भागातून आलो म्हणून न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मेहनत घ्या, कष्ट करा, मनापासून अभ्यास करा. यश तुमच्या पावलाशी येईल. स्वतःमधील कलागुण ओळखा आणि त्याच दिशेने प्रयत्न करा, आपले करिअर आपोआप घडेल,” अशा शब्दांत पत्रकार-कलाकार योगेश बांडागळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित आनंदराव पवार महाविद्यालयात ‘श्रीराम पावसाळी जल्लोष महोत्सव’ अंतर्गत २१ ते २३ जुलै या कालावधीत पावसाळी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप बुधवारी बक्षीस वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार-कलाकार योगेश बांडागळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थिनी आरती कांबळी हिने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपकार्यध्यक्ष राजन खेडेकर होते. कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, बांधकाम समिती प्रमुख सुहास चव्हाण, प्राथमिक शाळा समितीचे चेअरमन विजय बागवे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य अरुणा सोमण आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
पावसाळी क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धांमधील विजेते व उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रशांत देवळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाच्या माध्यमातून शासकीय नोकऱ्याही सहज मिळू शकतात, असे सांगितले. सिद्धेश लाड व विजय बागवे यांनीही मुलांना प्रेरणा दिली. अध्यक्षीय भाषणात राजन खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना जल्लोष करताना अभ्यास आणि करिअरची दिशा विसरू नका, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना योगेश बांडागळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करताना फुटबॉलपटू पेले व जलतरणपटू मायकल फ्लेप्स यांच्या यशोगाथा सांगितल्या. त्यांनी मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. स्पर्धा परीक्षा, अभिनय, लेखन, खेळ आदी माध्यमांतून करिअरच्या संधी कशा उपलब्ध होतात, हे उदाहरणांसह सांगितले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक महोत्सवाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या वेळी योगेश बांडागळे यांच्या हस्ते "गाऱ्हाणे" घालून व संगमेश्वर बोलीतून "शिकार" ही कथा सादर करण्यात आली. त्यांच्या सादरीकरणातून बोलीभाषेचे सौंदर्य आणि ग्रामीण अनुभवांचे संवेदनशील दर्शन घडले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. नृत्य, नाट्य, गायन, कविता सादरीकरण आदी सादर करत विद्यार्थ्यांनी आपले कलागुण खुलवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका हरवडे हिने उत्साही शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी स्वतःहून केले होते, ही महोत्सवाची जमेची बाजू ठरली.
हा संपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक भान व कलात्मक अभिव्यक्ती वाढवणारा ठरला. करिअरच्या वाटचालीत शिक्षणासोबतच बोलीभाषा, खेळ, संस्कृती व सृजनात्मकतेला महत्त्व देण्याचे संस्कार देणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील.