उ‌द्यानविद्या महाविद्यालयात योग कार्यशाळा !

Edited by: दिपेश परब
Published on: June 22, 2024 14:27 PM
views 129  views

वेंगुर्ला : योगाभ्यासाचा नियमित अंगीकार केल्यामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे योगाचे महत्त्व ओळखून योगाभ्यास जनजागृतीसाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. 

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने उ‌द्यानविद्या महाविद्यालय, मुळदेच्या कृषीदूतांमार्फत 'जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालकरवाडी क्र.२' येथे योग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून गावचे सरपंच मा.यशवंत पाटील यांचे योगदान लाभले. तसेच या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सावंत तसेच इतर शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे योगासने, महत्व व त्याचे फायदे शिकविण्यात आले.

ह्या कार्यशाळेमध्ये मुलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कृषीदूत, मुख्याध्यापिका व पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, प्राणायाम व विविध आसने मुलांना शिकवण्यात आली. ह्या आसनांच्या माध्यमातून मुलांचा आत्मविश्वास वाढला, तसेच त्यांना आनंद सुद्धा मिळाला.