योग दिनानिमित्त हळबे महाविद्यालयात योग प्रशिक्षण कार्यशाळा

Edited by: संदीप देसाई
Published on: June 22, 2023 14:45 PM
views 67  views

 दोडामार्ग : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जगभरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याचेच औचित्य साधून येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात योग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दोडामार्ग येथील योग प्रशिक्षक श्री राज पुरोहित यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. योग प्रशिक्षक राज पुरोहित यांचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी आपल्या मनोगतात मानवी जीवनात निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने योगा केला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे आपले कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी योगसाधना करून चांगले आयुष्य जगणे महत्वाचे आहे. योगसाधना ही आपली संस्कृती आहे. अनेक ऋषीमुनींनी योगाचे महत्व पटवून दिले आहे असे मत व्यक्त केले. 

श्री राज पुरोहित यांनी योग, योग म्हणजे काय, योगाचा जन्म, त्याचे महत्व सांगून विविध योगासने, त्यांचा मानवी शरीरासाठी होणारा फायदा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आहार कोणता आणि कधी  घ्यावा, शरीराची काळजी कशी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमासाठी मोठया संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. राजेंद इंगळे यांनी तर पाहुण्यांचे आभार प्रा. दिलीप बर्वे यांनी मानले.