
तळेरे : विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत, या दिनाचे औचित्य साधून योग प्रात्यक्षिके आणि ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा योग शिक्षक तेजल कुडतरकर हिच्या मार्गदर्शनाखाली झाली. योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम यावर सविस्तर माहिती दिली. सूर्यनमस्कारापासून ते प्राणायामाच्या विविध प्रकारांपर्यंत, त्यांनी सोप्या पद्धतीने आसनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि त्याचे फायदे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सूचनांचे पालन करत योगासने केली, ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा संचारली.
योगासने सत्रानंतर, सहा. प्रा. प्रशांत हटकर यांनी 'अनापान ध्यान साधना' याविषयी माहिती दिली. ध्यानाचे महत्त्व, मन शांत आणि एकाग्र ठेवण्यासाठी अनापान ध्यानाचा कसा उपयोग होतो, हे समजावून सांगितले. उपस्थितांकडून दहा मिनिटांचे अनापान ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक सुद्धा करून घेतले. या ध्यानसत्रामुळे सर्वांना आंतरिक शांतता आणि एकाग्रता अनुभवता आली.
या प्रसंगी सहा.प्रा. नरेश शेट्ये यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे प्रास्ताविक व महत्त्व विशद केले. सहा.प्रा. नितीश गुरव यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. योगामुळे ताणतणाव कमी होतो, प्रतिकारशक्ती वाढते आणि एकाग्रता सुधारते, यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमाला सहा. प्रा. निनाद दानी, सहा. प्रा. विशाल भोसले यांच्यासह महाविद्यालयाचे इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.