सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये 'AI रिव्होल्यूशन : फ्रॉम मशीन लर्निंग टू जनरेटिव्ह AI' या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील अभियांत्रिकी शिखर संस्थेने ही राष्ट्रीय कार्यशाळा पुरस्कृत केली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून दीडशेपेक्षा अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. याचे उद्घाटन आज सायंकाळी करण्यात येणार असून पुढील सहा दिवस विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकंदरीत प्रवास आणि सद्यस्थितीतील प्रगती या बद्दल शिक्षकांना अद्ययावत माहिती देणे असे आहे. यामध्ये मशीन लर्निंग संकल्पनेचा आढावा, अत्याधुनिक जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचे बदललेले स्वरूप तसेच चालू संशोधनाद्वारे निर्माण होणारी परिस्थिती यांचा समावेश आहे.
एआयसीटीई मार्फत ऑनलाइन अटल अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील शिक्षकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. ही अकादमी शिक्षकांना अपडेट राहण्यास मदत करते आणि अशा प्रशिक्षण वर्गाद्वारे संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी मदत करते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून एनआयटी, सी-डॅक, एमआयटी, टॅम्पर युनिव्हर्सिटी फ्लोरीडा, ऍगडर युनिव्हर्सिटी, नॉर्वे येथील नामवंत प्राध्यापक तसेच कॉगनिझन्ट-पुणे आणि क्वान्टिफाय-बेंगलुरु या कंपन्यांचे एक्सपर्ट्स मार्गदर्शन करतील.
कार्यशाळेचे मुख्य समन्वयक म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे व सहसमन्वयक म्हणून प्रा. मनोज खाडिलकर जबाबदारी सांभाळत आहेत. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल या राज्यातील शिक्षकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकांना या कार्यशाळेचा चांगला उपयोग होईल असा विश्वास डॉ.बाणे यांनी उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.