
सावंतवाडी: इन्सुलीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी धक्का दिला आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत दोन ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, कृष्णा सावंत, सचिन पालव, माजी सरपंच विजय डुगल, अर्जून मेस्त्री, उप तालुका संघटक आपा आमडोसकर, मनोहर गावकर यांनी प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उप जिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ज्येष्ठ नेते अशोक दळवी, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी उपसरपंच नाना पेडणेकर, पूजा पेडणेकर, परिक्षित मांजरेकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, गावच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तुमच्या सुखदुःखात सोबत राहू, असं मत व्यक्त केले. तसेच या प्रवेशासाठी उप जिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस व तालुकाप्रमुख बबन राणेंच कौतुक करत प्रवेशकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. उपजिल्हा प्रमुख श्री. फर्नांडिस यांनी यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.










