
सावंतवाडी : महाराष्ट्राच्या मातीतील मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती, कुस्ती या खेळाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी आणि नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांनी पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या मान्यतेने सावंतवाडी येथील शिव उद्यानात रविवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता 'मल्लसम्राट केसरी कुस्ती स्पर्धा २०२४' संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजन पोकळे (माजी उपनगराध्यक्ष, सावंतवाडी.), जावेद शेख (अध्यक्ष - मल्लप्रतिष्ठान, सावंतवाडी), सुधीर आडिवरेकर (माजी आरोग्य सभापती सावंतवाडी नगरपरिषद), माजी नगरसेवक बाबु कुडतरकर, सुनील राऊळ (मुख्य कार्यकारी अधिकारी सैनिक पतसंस्था, सिंधुदुर्ग), बाबु कुडतरकर (माजी नगरसेवक)सामाजिक कार्यकर्ते आबा केसरकर, ललित हरमलकर (सचिव - मल्लप्रतिष्ठान, सावंतवाडी), संतोष राऊळ (सरपंच, कोलगाव) उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा महिला आणि पुरुष अशा दोन गटात रंगणार आहेत. या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये वजनीगट मुली 35 किलो, 40 किलो, 44 किलो, 48 किलो, 54 किलो, आणि 60 किलो हून पुढे, मुलगे 40 किलो, 48 किलो, 54 किलो, 60 किलो, 68 किलो, 74 किलो व 85 किलो हून पुढे असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षीस म्हणून मानाची गदा प्रदान करण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक कुस्तीपटूला आकर्षक प्रमाणपत्र तर विजेत्या कुस्तीपटूला रोख रक्कम पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्लांनी बक्षिसांची लयलूट करावी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित रहावे, असे आवाहन मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अध्यक्ष जावेद शेख, सचिव ललित हरमलकर, उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, माजी नगरसेवक बाबु कुडतरकर, खजिनदार गौरव कुडाळकर, सदस्य संकेत माळी, बुधाजी हरमलकर व समस्त मल्ल सम्राट प्रतिष्ठान व नाम. दीपकभाई केसरकर मित्र मंडळ, सावंतवाडी यांनी केले आहे.










