सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सार्थ अभिमान : मंत्री आशिष शेलार

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 23, 2025 19:31 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल. सिंधुदुर्ग बँकेने नुकताच ६००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. तसेच बँकेने केलेली प्रगती, अत्याधुनिक डिजीटल सुविधा राबविण्यात निपुणता मिळवीत महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान मिळवलेले आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी केले. त्यांनी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब यांनी मंत्री ना.आशिष शेलार साहेबांचे स्वागत करुन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमय गणेशमुर्ती भेट दिली. तसेच बँकेचे उपाध्यक्ष  अतुल काळसेकर यांनी श्रीमती शेलार यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.