
सावंतवाडी : शहरातील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वाणिज्य तसेच बँकिंग अँड इन्शुरन्स आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने 'आरबीआय मधील नोकरीच्या संधी' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले,
आरबीआयच्या असिस्टंट जनरल मॅनेजर दीपिका नेगी, असिस्टंट मॅनेजर प्रफुल्ल ठाकूर, निखिल आमटे तसेच ऋशी यादव, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जी. एम. शिरोडकर आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेमध्ये निखिल आमटे, प्रफुल्ल ठाकूर, दीपिका नेगी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरबीआय मधील नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या विविध संधी याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. किमान पात्रता, वर्षातून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्तराच्या परीक्षा, अभ्यासक्रम, उत्तीर्ण होण्याच्या कसोट्या इत्यादीबाबत सखोल मार्गदर्शन ओघवत्या शैलीमध्ये केले. या कार्यशाळेला अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन प्रफुल्ल ठाकूर आणि दीपिका नेगी यांनी केले. या कार्यशाळेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. हर्षद राव यांनी केले तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सचिन देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. वासुदेव बर्वे यांनी केले.
सदर कार्यशाळेला वाणिज्य विभागाच्या प्रा. सुनयना जाधव, रामचंद्र तावडे, संदेश सावंत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.