यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट तर्फे AI - मशीन लर्निंगवर कार्यशाळा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2024 12:40 PM
views 131  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा कॉम्प्युटर विभागातर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत राज्यातील विविध कॉलेजचे एकूण ६५ शिक्षक सहभागी झाले होते.

     कार्यशाळेचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची माहिती करून देणे व विषय प्रभावीपणे शिकवण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे असा होता. यावेळी विषय तज्ञ म्हणून सॉफ्टमस्क टेक्नॉलॉजीचे शिवम बने आणि अमित हलासुरे उपस्थित होते. दोन्ही तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पना, प्रगत टेक्नॉलॉजी आणि सध्याचा वापर याविषयी माहिती दिली. सोबतच विविध क्षेत्रातील केस स्टडीजही सादर केल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी शिक्षकांनी कॉलेजच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी या कार्यशाळेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा असे आवाहन केले. यावेळी कॉलेजचे उपप्राचार्य गजानन भोसले, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रशांत काटे उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर मयेकर आणि संचिता कोलापटे यांनी केले.