
सावंतवाडी : महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न उराशी बाळगून जीवनात स्वावलंबी व्हावे. नेमके कोणत्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे ? हे ठरवा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा यश निश्चितच मिळेल असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केले. आदर्श महिलांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून कार्य करा असेही आवाहन त्यांनी केले. महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
सावंतवाडी येथील वुमन्स कॉलेजच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड हेल्थ अध्यक्ष संतोष सावंत, शिक्षण प्रसारक मंडळ संचालक सी.एल. नाईक,राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनि काॅलेजचे मुख्याध्यापिका सौ. संप्रवी कशाळीकर, सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी ॲण्ड हेल्थ सचिव सौ.समिधा सावंत, जे.बी.नाईक काॅलेज प्राचार्या अस्मिता ठाकूर, रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद भागवत, वुमेन्स काॅलेज प्राचार्य पुष्पराज सावंत आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राणी पार्वती देवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक जगदीश धोंड, पत्रकार अमोल टेंबकर यांचा संस्थेच्यावतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कॉलेजच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या असिया साळगावकर, व्हेलेंसिया अलमेडा, सुहानी पेडणेकर, वैष्णवी पालव, ओंकार नाईक, हर्षाली शेल्टे, सौम्या कुबाडे, स्वरूपा नाईक, वैष्णवी गवळी, मयुर शेटकर, अनामिका, स्वरूपा नाईक, मयुरी शेटक, तनस्वी सावंत, साक्षी पटेकर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सावंत म्हणाले, या ठिकाणी विद्यार्थिनींना चांगले शिक्षण मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी शिकवल्या जाणाऱ्या कोर्स सह नियमित जीवनात येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड द्यावे याबाबत माहिती दिली जात आहे. त्यामुळे याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना होणार आहेत. श्री. भागवत म्हणाले, महिला कुठच्याही क्षेत्रात आता मागे राहिलेल्या नाहीत प्रत्येक ठिकाणी त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. एखादी महिला एकाच वेळी अनेक कामे करू शकते. ते पुरुष करू शकत नाहीत. त्यामुळे ती कुठच्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. मात्र आपण कुटूंब म्हणून तिच्या पाठीशी कायम राहणे गरजेचे आहे. प्रा.ठाकूर म्हणाल्या, महिलांवर होणारे अत्याचार ही चिंतेची गोष्ट आहे. परंतु असे अत्याचार होत असताना महिलांनी आणि विशिष्ट विद्यार्थ्यांनी आपण कोणाच्या आव्हानाला किंवा सांगण्याला बळी पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, मोबाईलचा वापर करताना अनेक गोष्टी टाळाव्यात जेणेकरून त्याचा पश्चाताप पुढील आयुष्यात होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी अन्य उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले.